मुंबई- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दादरच्या भाजीपाला बाजारात होत असलेल्या अनावश्यक गर्दीला पाहता पालिकेने येथील बाजार दोन दिवसांपुर्वी चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर हलवला आहे. मात्र, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही याठिकाणी नागरिक मोठी गर्दी करीत असल्याने सोशल डिस्टन्सचा तीनतेरा वाजत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा- जम्मू-काश्मीरमधील 4-G इंटरनेट सेवा सुरू करावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका..
मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लाॅकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. यातच नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. मुंबई शहरातील व उपनगरातील भाजीपाला बाजारात होत असलेल्या गर्दीला पाहून बाजार बंद केला आहे. तर त्या ठिकाणचा बाजार गर्दी होणार नाही अशा ठिकाणी हलवला आहे.
दादरच्या सेनापती बापट मार्गावरील भाजीपाला चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर हलवण्यात आला आहे. मात्र, याठीकाणीही असला तरी नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. या ठिकाणी ना सोशल डिस्टन्स पाळला जात आहे. ना आरोग्याची कोणती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही कोरोनाचे गांभीर्य लक्षात न आल्याचे यावरुन दिसत आहे.
भाजीपाल्याची गाडी आल्यानंतर नागरिक एकच गर्दी करुन या गाडीवर अक्षरशा: तुटून पडत आहेत. त्यामुळे अशा गर्दीने कोरोना विषाणूचा प्रसार आणखीन वाढण्याचे धोका वाढत आहे. या मैदानाच्या जवळील परिसरातील धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.