मुंबई - मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राणी बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार नियंत्रित असल्याने अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारने नॅशनल पार्क पर्यटकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लवकरच पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेली राणीबागही पर्यटकांसाठी खुली होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चार कोटींचा महसूल बुडाला -
लॉकडाऊनमुळे राणीबाग पर्यटकांसाठी मार्च महिन्यापासून बंद आहे. नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने वीरमाता जीजाबाई उद्यानाचे कोट्यवधींने महसूल घटले आहे. मागील आठ महिन्यांत सुमारे चार कोटींचा फटका आहे. लाॅकडाऊन आधी राणीबागेत सरासरी दिवसाला १५ ते २० हजार पर्यंटक भेट देत असत. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवसांत हा आकडा ३० हजारपर्यंत जात असे. त्यामधून राणीबागेला महिन्याला सुमारे ४५ लाखांचा महसूल मिळत होता. मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राणी बाग पर्यटकांसाठी बंद आहे. यामुळेच दररोज तब्बल दीड लाखांचा महसूल बुडत आहे.
एसओपी तयार -
बोरिवली येथील नॅशनल पार्क खुले करण्यात आले आहे. त्यामुळे राणी बाग पर्यटकांसाठी खुली करण्यास काहीच हरकत नाही. सेंट्रल झू अँर्थोरेटीने देशभरातील प्राणीसंग्रहालय सुरु करण्यास हरकत नाही, असे कळवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास राणीबाग पर्यटकांसाठी खुली होईल. दरम्यान, लाॅकडाऊन आधी २० हजार पर्यटक येत होते. कोरोना काळात रोज तीन ते चार हजार पर्यटकांना परवानगी दिल्यास योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
हेही वाचा - पर्यटन विकासासाठी शासनामार्फत व्यापक कार्य केले जाईल - पर्यटन मंत्री
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात दिवसभरात ३ हजार ८८० कोरोनाचे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू