मुंबई - मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम संदर्भात अनेक मतमतांतरे असताना आता ईव्हीएम विरोधक आक्रमक झाले आहेत. देशभरातील ईव्हीएम विरोधातील संघटना मुंबईत एकवटणार आहेत. येत्या 12 जूनला मुंबईत मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात त्यांची परिषद होणार आहे. ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी या परिषदेसाठी देशभरातील संघटनांशी संपर्क केला आहे. या परिषदेला 15 राज्यातील 250 संघटना सहभागी होतील, अशी माहिती जन आंदोलनाचे कार्यकर्ते रवी भिलाने यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीतील निकाल संशयास्पद असल्याने या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. जेष्ठ स्वतंत्र सैनिक जी. जी पारीख या परिषदेचे नेतृत्व करत असल्याचेही भिलाने यांनी सांगितले.
ईव्हीएम विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत सामजिक कार्यकर्ते आहेत. स्वातंत्र्य सैनिक, राजकीय नेते आणि कायद्याचे अभ्यासकही या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
ईव्हीएमचा विरोध करून संविधानाने दिलेली लोकशाही वाचवण्यासाठी देशभरात चळवळ उभारण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.