मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील काही मंडळे देखील पुढे आली आहेत. भांडुपमधील उत्साही मित्र मंडळ लसीकरण मोहिमेबाबत डोंगराळ भागामध्ये जनजागृती करत आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे मित्रमंडळ या भागामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहे. या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने.
हेही वाचा - आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करणाऱ्या चिथावणीखोरांपासून सावध रहा - अशोक चव्हाण
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईतील विविध संस्था, संघटना देखील प्रशासनाच्या हातात हात घालून मदतकार्य करत आहेत. भांडुपच्या उत्कर्ष नगर, कोकण नगर, जमिल नगर, समर्थ नगर, सह्याद्री नगर इत्यादी भागांत 30 ते 40 हजार लोकवस्ती असलेल्या दाटीवाटीच्या डोंगराळ झोपडपट्टी असलेल्या विभागात या उत्साही मित्र मंडळाचे कार्यकर्ते लसीकरण जनजागृती मोहीम राबवत आहेत. इथे राहणारे लोकही कष्टकरी मध्यम किंवा गरीब वर्गीय आहेत. या विभागात प्रशासनाला मदत पोहचवणे काहीसे कठीण आहे, कारण या भागात डोंगराळ वस्ती मोठ्या प्रमाणात आहे, तसेच लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे या मोहिमेंतर्गत मंडळ प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांत आठशे घरापर्यंत ही मोहीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोहचवली आहे. लसीकरण करणे किती महत्वाचे आहे, तसेच लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते या सर्व्हे अंतर्गत करत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून विविध उपक्रमांतून मदत कार्य
गेले दीड वर्ष हे मित्र मंडळ विविध उपक्रम घेऊन मदत कार्य आणि सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहे. शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, जेवण वाटप, अत्यावश्यक वस्तूंचे वाटप, गर्दी टाळण्यासाठी थेट घरी स्वस्तात भाजी विक्री, रक्तदान शिबिरे आणि आता लसीकरणाबाबत जनजागृती आणि नोंदणी, असे उपक्रम हे मंडळ राबवत आहे.
कौतुकास्पद कार्य
खरेतर विभागातील मंडळ ज्याप्रमाणे सण-उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात, आज विभागावर कोरोनाची संकट आल्यानंतरही त्याच जोशात एकत्र येऊन मदत कार्य हे मंडळ करत आहे. उत्साही मित्र मंडळ ज्या विभागात आहे तसे अनेक डोंगराळ झोपडपट्टी असलेले विभाग मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे उत्साही सारखेच जर इतर मंडळांनीही विभागात कोरानाला रोखण्यासाठी कार्य केले, तर नक्कीच त्याचा मोठा फायदा नागरिकांना आणि प्रशासनाला होईल.
हेही वाचा - माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तपासासाठी सीबीआयला मार्ग मोकळा - मुंबई उच्च न्यायालय