मुंबई - माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना कोहिनूर मिलप्रकरणी शुक्रवारी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ते आज ईडीच्या कार्यालयात चौकशीला गेले आहेत.
बुडीत निघालेली 'आयएल अँड एफएस' कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. आयएल अँण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती. मात्र, कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएल अँण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सला उभे करण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती.
आयएल अँण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे? याची चौकशी सध्या ईडी करत आहे. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ते कंपनीला चुकते करणे शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अँण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अँण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली. मात्र, या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.