मुंबई - 'मिशन बिगेन' अंतर्गत आजपासून काही सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यात १० टक्के खासगी कार्यालय सुरू करण्यालाही परवानगी आहे. त्यामुळे आज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी कर्मचारी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने रस्त्यावर वाहतूक वाढली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर, मुंबईच्या दक्षिण भागात जाण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
लॉकडाउन पाचमध्ये राज्य शासनाने काही निर्बंध शिथिल करत व्यवहार पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. यात राज्य सरकारने १० टक्के खासगी कार्यालय सुरू करण्यालाही परवानगी आहे. मागील तीन महिन्यांपासून घरी असलेले कर्मचारी पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये हजर होण्यासाठी घराबाहेर पडले. त्यामुळे मालाड ते वांद्रे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुक वाढल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली होती. काही काळ या महामार्गावरिल वाहतूक संथगतीने सुरू होती.
दरम्यान, देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन १ मेपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चार पट वाढ झाली असुन मृतांच्या संख्येतही तीन पट वाढ झाल्याचे दिसत आहे. सद्य घडीला देशात २ लाख ५६ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर ७ हजार १३५ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने अनलॉक-१ जाहीर करत सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा - आजपासून सामान्य प्रवाशांसाठी 'बेस्ट' बससेवा सुरु, मुंबईकरांना दिलासा
हेही वाचा - शासन आदेश येईपर्यंत शिक्षकांना शाळेत येण्याचा आग्रह धरू नका; शिक्षक परिषदेची मागणी