मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा वाद न्यायप्रविष्ट असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह गोठवले. सध्या दोन्ही बाजूंनी तोंडी आणि लेखी युक्तिवाद झाला आहे. निवडणूक आयोगाने जोपर्यंत अपात्र आमदारां संदर्भात निकाल लागत नाही तोपर्यंत निर्णय देऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर १६ जण अपात्र ठरल्यास पक्ष आणि चिन्हाचे काय असा, प्रश्न देखील उपस्थित केला. मातोश्री येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंची पत्रकारपरिषद : गेली सहा महिने शिवसेनेचे काय होणार? गद्दारांचे काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या १४ पासून नियमित होणार आहे. निवडणूक आयोगाकडे आमचे मुद्दे मांडलेले आहेत. सध्या आमच्या शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे स्पष्टीकरण करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे ठाकरे म्हणाले.
गद्दारांना घटना मान्य नाही : उद्धव ठाकरे पत्रपरिषदेत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत 23 जानेवारीला संपली आहे. निवडणुक आयोगाकडे निवडणुक घेण्याची परवानगी मागितली. त्यावर अद्याप निर्णय नाही. परवानगी मिळाल्यावर निवडणूक घेऊ, मात्र शिवसेनाप्रमुखपद तसेच ठेऊन पक्षप्रमुख पद स्वीकारले आहे. मुख्य नेता असे शिवसेनेत पद नाही. गद्दारांना शिवसेनेची घटना मान्य नाही, असे मागेच सांगितले आहे.
शिंदे गटावर टीका : ते पुढे म्हणाले की, लाखांच्या घरात प्रतिज्ञापत्र आम्ही दिलेले आहेत. गद्दारांचा दावा हास्यास्पद आहे. इतके दिवस निकालास वेळ लागायची गरजच नव्हती. आम्ही सगळ्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. पक्षांतर्गत लोकशाही प्रमाणेच शिवसेना निवडणुका घेतो. २० जूनला पक्षादेश मोडला आहे. गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा नीचपणाचा कळस असल्याची टीका शिंदे गटावर केली.
अपात्रतेचा निकाल लागावा : उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेतील फुटीनंतर जुलै महिन्यात निवडणूक आयोगात त्यांनी शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला. परंतु, घटनातज्ज्ञांची मते, विचारात घेतली असता, आमच्या बाजूने मत मांडली आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली निघेस्तोवर निवडणुक आयोगाने निर्णय घेऊ नये. सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निकाल लवकर लागावा ही अपेक्षा आहे. लोकशाहीच्या दृष्टीने अपात्रतेचा मुद्दा महत्वाचा आहे. विधीमंडळ पक्ष म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे, अशाने पैशांचा जोरावर कुणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री होईल. या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, अशी अपेक्षा आहे. तसेच अपात्रतेचा मुद्दा अगोदर निकाली निघायला हवा, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
16 आमदार अपात्र ठरणार : आमचा लोकशाही, न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. तसेच आमची बाजू भक्कम आहे. धनुष्यबाण का गोठावला, गद्दारांनी अद्याप कुठलीच निवडणुक लढवलेली नाही. तसेच ते १६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. मग निवडणुक आयोगाने इतकी घाई का केली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवसेनेची अशी आहे घटना : शिवसेनेची घटना अयोग्य आहे हा दावाच चुकीचा आहे. पक्षाची निवडणुक होण्यागोदर निवडणुक निर्णय अधिकारी नियुक्त होतात. पदांसाठी उमेदवारीचे अर्ज मागवला जातात. एकच अर्ज आल्यावर तसे निवडणुक आयोगाला कळवल्या जातात. त्यानंतर प्रस्ताव, अनुमोदक सर्व कायदेशीर, लोकशाही प्रक्रिया पार पाडून पक्षांतर्गत निवडणुक घेतल्या जाते. निवडणुक आयोगाला ह्या सर्व प्रक्रियेची माहिती आणि त्यावर निवडणुक आयोगाने त्यावर आजवर शिक्कामोर्तब वेळोवेळी केले आहे. निवडणुक आयोगात आजवरची सगळी माहिती दिल्याचे शिवसेना खासदार अनिल परब यांनी सांगितले.
हेही वाचा : Balasaheb Thorat Resigns : बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर होणार? दिल्लीतून हालचाली सरू...