मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मागील देखावा पुढील वर्षी कायमस्वरुपी करणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या कामगार सेनेच्यावतीने या पुतळ्याभोवती देखावा उभारण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात देशी-विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्यामागील देखावा कायमस्वरूपी केला जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे किल्ला व किल्ल्याच्या मागील भागात मुंबा आईची मूर्ती साकारण्यात येणार आहे. यामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झळाळी प्राप्त होणार आहे.
दरम्यान, विमानतळ परिसरात पुतळा उभारल्यापासून पुतळ्याचे धूळ व इतर गोष्टींपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर छत्री उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मात्र, याकडे अद्याप सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. याची मागणी सामाजिक संस्थाकडूनही केली जात आहे.