मुंबई : मुंबईत घर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतीस भांडुप खिंडीपाडा येथून ही घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या पैकी दोन्ही व्यक्ती १८ ते १९ वयाचे युवक असल्याची माहिती आहे. पालिकेच्याआपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याआधी इमारती कोसळल्याच्या अनेक घटना मुंबईत घडल्या आहेत. अनेक जम यात जखमी झाले आहेत. काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
दोन जणांचा मृत्यू : भांडुप खिंडीपाडा डंकन लाईन रोड, क्रांती मित्र मंडळ येथील तळ अधिक एक मजली घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीचे काम सुरू असताना या घराचा काही भाग कोसळला. यामुळे ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते. या दोघांना मुलुंड येथील एम टी अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वी त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजकुमार धोत्रे (१९ वर्षे), रामानंद यादव (१८ वर्षे) अशी मृत युवकांची नावे आहेत.
घर कोसळण्याच्या घटना : २३ जानेवारी २०२२ रोजी कुर्ला एसबी बर्वे मार्ग, आंबेडकर नगर येथील पालिकेच्या अंजुमन इमारतीजवळ सकाळी १०.३० च्या सुमारास एका घराचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली एक महिला अडकली होती. तिला मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून कुर्ला नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले. मात्र या महिलेचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. या मृत महिलेचे नाव लता रमेश साळुंखे असून ती ५३ वर्षाची होती.
२८ फेब्रुवारी २०२२ ला अशीच घटना : २८ फेब्रुवारी २०२२ रोजी कुर्ला पश्चिम, राम मनोहर लोहीया मार्ग, हायटेक परिसर, विनोबा भावे पोलीस स्थानक जवळ एक दुमजली म्हाडाची इमारत आहे. या इमारतीमध्ये शॉपिंग सेंटर सुरु होते. शॉपिंग सेंटरच्या पहिल्या माळ्याचा सज्जाचा भाग दुपारी २. ४० च्या सुमारास तळमजल्यावर असलेल्या उपहारगृहावर पडला. या घटनेत अफान खान (५), रफिक शेख ( ४६), इरफान खान ( ३३), मोहमद जिकरान (६) असे ४ जण जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. राजावाडी रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सचीन यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार ४ जखमींपैकी अफान खान (५) या लहान मुलाचा मृत्यू झाला होता.
६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू : आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या. यांत १७९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : Deoghar Crime News : गुन्हेगारांबरोबर झालेल्या चकमकीत दोन पोलिसांचा मृत्यू