मुंबई: मध्य रेल्वेवर १९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ब्लॉक दरम्यान घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ, भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. आज १८ मार्च आणि १९ मार्च मध्यरात्री 11.50 ते 04.20 वाजे पर्यंत कुर्ला येथे 140 टी रेल्वे क्रेन वापरून कुर्ला स्थानकावर 8.0 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्डर लॉंच केले जाणार आहे. या कामासाठी अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील शेवटची लोकल PL-203 ही CSMT वरून रात्री 11.14 वाजता सुटेल. अप हार्बर मार्गावर सगळयात शेवटी धावणारी लोकल वडाळा रोड वरुन रात्री 11.08 वाजता सुटणार आहे. तर मेल एक्स्प्रेसच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. ट्रेन क्रमांक 11020 कोणार्क एक्सप्रेस गाडी क्रमांक 12810 हावडा मुंबई मेल, ट्रेन क्रमांक 12134 मंगळुरू मुंबई एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक 12702 हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस या मेल एक्स्प्रेस मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.