मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, तरीही काही नागरिक शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. रिकाम्या रस्त्यावर टिक-टॉक व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकणाऱ्या दोन तरुणांना मुंबईतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
गोवंडीच्या महावीर हॉस्पिटल समोरील बाजीप्रभू देशपांडे मार्गावर काल सकाळी सलीम शेख (24) आणि मोहम्मद फाहाद सलीम शेख (27) या दोन तरुणांनी एक टिक टॉक व्हिडिओ बनवला. यात त्यांनी सेलिब्रिटीला पोलीस मारत नाहीत. आम्ही सुद्धा सेलिब्रिटी असून आम्हाला पोलीस काहीच करत नाही, असा उल्लेख करत व्हिडिओ बनवला आणि तो सर्वत्र प्रसारित केला.
पोलिसांनी या दोघांना भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना या कायद्याखाली अटक केली आहे. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पोलिसांची आणि जनतेची माफी मागितली. आम्ही चूक केली, असा प्रकार कोणीही करू नये आणि लॉकडाऊनच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन केले.