मुंबई - ईशान्य मुंबई भाजप शिवसेना युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी आज (रविवार) सायंकाळी घाटकोपर बेस्ट आगार ते भांडुप अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुण-तरुणी विना हेल्मेट मोटारसायकल चालवत होते. तसेच मोठया प्रमाणात हॉर्न वाजवत येत होते.
मात्र, या रॅलीत वाहतूक शाखेच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. रॅलीतील बहुतांश कार्यकर्त्यांनी विनाहेल्मेट वाहन चालवले. तसेच कार्यकर्त्यांनी आवश्यकता नसतानाही हॉर्न वाजवत परिसरात गोंधळ केला.
मोटारसायकल रॅलीत उमेदवार मनोज कोटक विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्यासह उघड्या कारवर उभे होते. त्यांच्यासोबत भाजप नेते भालचंद्र शिरसाट, भाजपचे युवा नेतेही उपस्थित होते. रॅलीत काही तरुण मोटारसायकलवर पाठीमागे चेहरा करून बसले होते. दरम्यान, हॉर्न वाजवू नका अशा सुचना रॅलीत देण्यात येत होत्या. मात्र, कार्यकर्त्यांनी आपला मनमानी कारभार करत हॉर्न वाजवणे सुरूच ठेवले. यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.