मुंबई - घाटकोपर, विद्याविहार परिसरातील धोकादायक पूल पालिकेने वाहतुकीसाठी बंद केले आहेत. याचा फटका मुंबई पूर्व उपनगरातील वाहतुकीला बसत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय शहरात सर्वत्र मेट्रोचे काम सुरू असल्याने चाकरमान्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
हेही वाचा - मुंबई हल्ल्याचा दौषी हाफिज सईदला पाकिस्तानी न्यायालयाने ठरवले दोषी!
हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिकेने शहर आणि उपनगरातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण केले होते. यानुसार पूर्व उपनगरातील घाटकोपर बेस्ट आगार जवळील पूर्व-पश्चिम वाहतुकीला जोडणारा लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल बंद करण्यात आला. याशिवाय विद्याविहार येथील लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नीलकंठ नाल्यावरील पुलही पालिकेने बंद केला. यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना अनेक महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका, सोमय्या कॉलेजचे विद्यार्थी, लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारे प्रवासी यांचा प्रवास तब्बल ५० मिनिटांनी वाढला आहे.
हेही वाचा - महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग
घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील पूल नागरिकांच्या रोषानंतर फक्त हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र याचा फटका बेस्ट बसच्या वाहतुकीला बसत असून लाखोंचे नुकसान होत आहे. या बंद पुलांचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.