मुंबई - खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना अनुदान मिळावे या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. याबाबत काहीही निर्णय होत नसल्याने शिक्षक आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेनांच साकडे घालणार आहेत.
काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त कार्यालयाबाहेरही या शिक्षकांनी आंदोलन केले होते. गेल्या २० दिवसांपासून शिक्षकांचे आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. महापालिकेतील गटनेते, स्थायी समिती तसेच सभागृहामधील सर्व पक्षीयांचा शाळांना अनुदान देण्याच्या मागणीला पाठींबा आहे. मात्र, आयुक्तांचा अनुदान देण्यास नकार आहे.
शिक्षण मंत्र्यानी आझाद मैदानात भेट देऊन १ किंवा २ मार्चला बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन फेल ठरले आहे. यामुळे शिक्षक आता थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना साकडे घालणार आहेत. उद्धव ठाकरे जोपर्यंत भेट देणार नाहीत तोपर्यंत मातोश्रीबाहेर शिक्षकांचे ठिय्या आंदोलन सुरु राहणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.