मुंबई - सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून वाहतूक बंद आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता व्यसनाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. गुटखा, तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. तंबाखूने कर्करोगाचाही धोका आहे, अशा दर्शनी भागात मोठ्या अक्षरात सूचना देऊनही अनेकांसाठी 'व्यसन हे अत्यावश्यक आहे' याचाच प्रत्यय लॉकडॉऊन काळात येतोय.
संचारबंदीच्या काळात तंबाखूला मोठी मागणी आहे. त्याचा गैरफायदा काही दुकानदारांनी चांगलाच घेतला आहे. लॉकडाऊनमुळे पानटपऱ्या बंद असल्यानेदेखील तंबाखू आणि सुपारीचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांनी चांगलीच माया जमवल्याचे दिसत आहे. व्यसन करणारे देखील मिळेल त्या भावाने गुटखा, तंबाखू मिळेल तिथे शोध घेत वणवण फिरत आहेत. धारावी कुंभारवाड्यात राहणारे राजेश सोलकर नामक व्यक्ती तंबाखूसाठी तळफगार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्याला तंबाखू मिळणे कठीण होऊन बसले. तंबाखू खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही, तंबाखू न मिळाल्याने तो अस्वस्थ होतो. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल परंतु तंबाखू हवीच अशी त्याची परिस्थिती आहे.
तंबाखूसाठी कायपण..?
'रात्री धारावीत राहणाऱ्या राजेशकडील तंबाखू संपली. त्यामुळे तो सकाळी उठल्या-उठल्या तोंड न धुता धारावी विभागातील छुप्या मार्गाने तंबाखू मिळते त्या ठिकाणी फिरला. मात्र, कुठेच त्याला त्याला हवा असलेली तंबाखू किंवा इतर काही मिळालं नाही. मग राजेश घरी आला, तो दिवसभर अस्वस्थ होता. दुपारचे जेवणही केले नाही. दरम्यान, शेजारीच राहणारी आजी तिच्या कुर्ल्याला राहणाऱ्या मुलाशी बोलत होती. तेव्हा मुलाने सांगितले हिकडे कुर्ल्यात काळी तंबाखू मिळते, पाठवू का? हा संवाद ऐकताच राजेश चटकन आज्जीपाशी आला. फोन ठेवताच तुझा पोरगा कुठं रहातो. सांग मी चालत जाऊन घेऊन येतो तिकडून तंबाखू असं म्हणाला.
आजीने पत्ता सांगिताच राजेश लगेचच पायी भर उन्हात कुर्ल्यात गेला आणि 15 दिवस पुरेल इतकी तंबाखू घेऊन आला. आता घरी आल्यावर तो अस्वस्थ न्हवता खुश दिसत होता. तंबाखूसाठी पायपीट करणाऱ्या राजेशला दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोने माटुंगा कॅम्पमधून रेशन मिळत आहे, जरा घेऊन या म्हणाली, तर मी नाय जाणार ते माझं काम आहे का? असं तो बायकोला म्हणाला आणि गेलाच नाही' ही आहे व्यसनाधिन झालेल्या लोकांची वास्तव परिस्थिती. यावरून काही माणसांना तंबाखू किंवा व्यसन हे रेशनपेक्षाही जास्त गरजेचे वाटते, हे दिसून येते.
संचारबंदी असल्याने धारावी भागातील अनेक दुकानदारांकडे तंबाखूजन्य पदार्थ संपले आहेत. मात्र, तंबाखूचे व्यसन असलेल्या राजेशसारख्या अनेकांची बेचैनी वाढत असून, ती मिळविण्यासाठी ते मिळेल त्याठिकाणी वणवण फिरताना दिसत आहेत. मात्र, या दुकानांमध्येही तंबाखू, सिगारेट्सचा स्टॉक संपल्यामुळे अनेकजण दुकानदारांशी 'एक तरी पुडी द्या हो..' अशी विनवणी करताना, हुज्जत घालताना दिसत आहेत. काही ठिकाणी 7 रुपयाला मिळणारी तंबाखूची पुडी त्यांना 70 रुपयाला विकत घ्यावी लागत असतानाही ते घ्यायला धजावत आहेत.
लॉकडाऊनदरम्यान गुटखा, तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सहजासहज गुटखा किंवा तंबाखूची पुडी मिळणे कठीण होऊन बसले आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद आहेत. जी दुकानं खुली आहेत त्यात तंबाखू मिळणं कठीण आहे. तंबाखूच्या एका पुडीची किंमत 10 पट वाढली आहे. मात्र, तरीदेखील काही लोकांचं तंबाखू व्यसन अजूनही सुटलेलं नाही. याच व्यसनातून नाशिकमध्ये दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचीही घटना घडली होती. तंबाखूच्या एका पुडीसाठी मित्रानेच मित्राला इतर मित्रांना घेऊन मारहाण केली अशी घटना समोर आली. एका तंबाखूच्या पुडीवरुन मित्रांमध्ये वाद झाल्यामुळे आणि धारावीत राहणाऱ्या राजेशच्या घालमेलीवरून लॉकडाऊनसारख्या कठिण काळातही तंबाखूचे व्यसन हे इतके अत्यावश्यक कसे असू शकते? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.