मुंबई : सांताक्रुझमधील कालिना आणि नंतर बोरिवली परिसरातील एसआरए योजनेतर्ंगत स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तेरा लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपिंविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू माळी आणि संजय पाटील अशी या दोघांची नावे आहेत.
चौकशी करणार : संपत पाटील आणि राजू माळी या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे. का याचाही पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे. या प्रकरणातील तक्रारदार माहीम परिसरात वास्तव्यास असून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये क्लार्क म्हणून काम करतात. तेरा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या भावाच्या ओळखीने त्यांची इस्टेट एजंट असलेल्या राजू माळीशी संपर्क झाला होता. त्याने सांताकुझ येथील कालिना परिसरात एका एसआरए इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथे त्यांना एक वन बीएचके फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष राजू माळीने दाखवले होते. त्यानंतर तक्रारदार हे त्यांच्या पत्नी आणि राजूसोबत इमारतीच्या बांधकाम साईटवर गेले होते. त्यावेळी तिथे एसआरए इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. तिथेच राजूने त्यांची संजय पाटीलसोबत गाठ घालून दिली होती. पाटीलच फ्लॅटसाठी त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले होते.
तेरा लाखांची फसवणुक : फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी राजू आणि संजयला तेरा लाख वीस हजार रुपये धनादेश आणि रोकड स्वरुपात दिली होती. काही दिवसांनी त्याने फ्लॅटसंदर्भातील काही कागदपत्रे दिली होती. त्यात त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख होता. त्यामुळे त्यांना या इमारतीमध्ये फ्लॅट पक्का झाल्याची खात्री पटली होती. दोन ते तीन वर्षांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २०१७ पर्यंत त्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी संजयला याबाबत वारंवार विचारणा केली होती.
पोलिसांत तक्रार दाखल : यावेळी संजयने कालिना एसआरए इमारतीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगून त्यांना बोरिवली येथे फ्लॅट देण्याचे कबूल केले होते. तरी तिथेही त्यांना फ्लॅट दिला नाही. २०१० ते २०२३ या कालावधीत या दोघांनी फ्लॅटसाठी पैसे घेऊन त्यांना फ्लॅटसह फ्लॅटचे कागदपत्रे दिली नाही. नंतर पैसे परत करण्यास सांगितल्यानंतर देखिल त्यांनी पैसेही परत केले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी वाकोला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर राजू आणि संजय या दोघांविरुद्ध २३ फेब्रुवारीला वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सटकली, म्हणाले, माफिया को मिट्टी में देंगे...