मुंबई - मुंबई पोलिसांना catch me if u can (शक्य असल्यास मला पकडून दाखवा )असं चॅलेंज देणाऱ्या एका लॅपटॉप चोराला पोलिसांनी केवळ 24 तासातच गजाआड केले आहे. सोनू बनिया कुमार (27), असे या अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. आरोपी सोनू कुमार कारमधून लॅपटॉप चोरण्यात माहिर होता.
मुंबईतील विविध परिसरात रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून महागडे लॅपटॉप , मोबाईल चोरण्याचा घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात वाढ झाली होती. असाच एक प्रकार शिवडी परिसरात घडला असता, पोलीस तापासत मुंबई शहरात महागडे लॅपटॉप चोरणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. तपासादरम्यान त्यांनी एकूण 7 गुन्ह्यांची कबूली पोलिसांना दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एकूण 8 लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून या टोळीतील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा त्याला ज्या परिसरात चोरी करायची आहे त्या परिसरातील पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या गस्ती पथकांची रेकी करत होते, असे पोलीस तपासत समोर आले आहे.
शिवडी परिसरात जावेद मोनुद्दीन यांच्या वाहनातून तब्बल 1 लाख 40 हजारांचा लॅपटॉप, मोबाईल, आयपॉड चोरीस गेले होते. या संदर्भात त्यांनी शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असता पोलिसांनी परिसरातील सीसीटीवी फुटेज व खबऱ्यांच्या गु्प्त माहितीवरून मुंबईतील लोअर परेल परिसरातून सोनु कुमार यास अटक केली. या सराईत चोराने गेल्या काही महिन्यात मुंबईतील मालाड, वि.पी. रोड, भायखळा परिसरातून तब्बल 3 लाख 26 हजार रुपयांचे लॅपटॉप वाहनातून चोरल्याचे तापासत उघड झाले आहे.
आरोपी सोनू बनियाकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कुर्ला परिसरातून सुनील राजपुत ( 27) यास अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 3 लाख 96 हजारांचे मोबाईल, लॅपटॉप हस्तगत केले आहेत.