मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यपालांनी राज्यातील परिस्थितीची माहिती राष्ट्रपतींना द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी मी करत नाही पण राज्याचे घटनाप्रमुख या नात्याने राज्यपालांनी राज्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यांचा आढावा घेऊन राष्ट्रपतींना माहिती द्यावी ही आमची मागणी आहे आणि त्याकरता आम्ही 24 तारखेला आमचे शिष्टमंडळ चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात जाऊन राज्यपालांना भेटणार आहोत असे मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचे काम
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत देत जनतेने आशीर्वाद दिला होता परंतु राजकारण जिहाद करून शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणली. ही जनतेची थट्टा करत हे सरकार सत्तेवर आले आहे. ठाकरे सरकारने जनतेच्या हितासाठी काम करू असे आश्वासन दिले होते. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे घडत आहे ते महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचे काम या सरकारकडून होत आहे अशी खरमरीत टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
मंत्र्यांकडून सातवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे तक्रार करावी
परमबीर सिंग यांच्या पत्राबाबतची सत्य माहिती राष्ट्रपती यांच्याकडे राज्यपालांनी दिली पाहिजे. या संदर्भात दोन दिवसांनी राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. परमवीर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत राज्यपाल यांना देखील पत्र लिहिलेले आहे. हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यामुळे हे प्रकरण सहजतेने कोणी घेऊ नये. महाराष्ट्रातील मंत्री अशा प्रकारे कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला सतावत असतील तर त्यांनी त्यांनी राज्यपालांकडे तक्रारी पाठवाव्यात असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.
हेही वाचा- परमबीर सिंग यांचा गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न - नवाब मलिक