मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. मुंबईमध्ये हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही कोरोनाचे 600 रुग्ण आहेत. या ठिकाणी पालिकेचे सफाई कर्मचारी, पोलीसांनाही कोरोनाची लागण झाली असताना आता मुंबई अग्निशमन दलाच्या धारावी केंद्रातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे मुंबईत 8 हजार 613 रुग्ण असून 343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण वरळी आणि धारावीच्या झोपडपट्टीत आढळून येत असल्याने हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावीत कोरोनाचे 590 रुग्ण असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत पालिकेच्या सफाई कामगार, पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्या विभागात, रुग्णालयात पालिका आणि मुंबई अग्निशमन दलाकडून निर्जंतुकिकरणासाठी फवारणी केली जात आहे. याच कामाची जबाबदारी असलेल्या धारावी अग्निशमन केंद्रामधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. अग्निशमन अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असली तरी योग्य ती काळजी घेऊन इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या विभागात अग्निशमन दलाकडून निर्जंतुकिकरण केले जात आहे.
हेही वाचा - #LOCKDOWN : राज्यात दारू विक्रीला परवानगी; काही ठिकाणी गर्दी तर काही भागात बंदी !