मुंबई - मुंबई एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपत्तीची वाटणी करताना पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीच्या अपत्यांना त्यात वाटा मिळू नये यासाठी कोर्टात दाद मागितली होती. यावर दुसऱ्या पत्नीच्या मुलीनेही कोर्टात आपले म्हणणे मांडले. आपल्याला वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्काने अधिकार मिळावा असे त्यात म्हटले होते.
1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरे लग्न अवैध ठरवले जाते. असे असलं तरी दुसऱ्या पत्नीला झालेल्या अपत्याला वडिलांच्या वारसा हक्कावर अधिकार मिळायला हवा असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने मृत व्यक्तीच्या संपत्तीचे समान भाग करुन त्याचा एक हिस्सा हा दुसऱ्या पत्नीच्या मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडला निर्देशही जारी करण्यात आले आहेत. येत्या चार महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी असे कोर्टाने म्हटल आहे.
मृत व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला त्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा देण्यात यावा असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे. त्यानुसार संपत्तीची विभागणी केली जावी असेही म्हटले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडकडून जी भरपाई मिळणार आहे, ती देताना त्यानुसार विभागणी केली जावी असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.