मुंबई - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच दुर्घटनेवर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले असून यातील ११ मृतदेह हाती लागले आहेत.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या लिकेजबाबत स्थानिक लोकांनी आमदार, खासदार आणि संबंधित अधिकार्यांना कल्पना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि या दुर्घटनेला दोषी अधिकारी व आमदार, खासदार यांना जबाबदार धरण्यात यावे, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.