मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयने आज बंटी सजदेह यांची चौकशी केली. बंटी सजदेह हा क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितिका हिचा चुलत भाऊ आहे. याशिवाय तो कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँन्ड एन्टरटेनमेन्ट या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून सखोल चौकशी केली जात आहे. यात सीबीआयने आज (गुरूवार) रिया चक्रवर्तीसह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी केली. याशिवाय बंटी सजदेह याचीही सीबीआयने चौकशी केली. आज बंटी सजदेह याची सीबीआयने जवळपास तीन तास चौकशी केली.
काय आहे प्रकरण -
सुशांतसिंह राजपूतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियान हि बंटी सजदेह याच्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँन्ड एन्टरटेनमेन्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. या घटनेच्या एक आठवडा आधीच दिशाने आत्महत्या केली होती.
दिशा सालियान आणि सुशांत प्रकरणातील काही माहिती बंटीकडून मिळण्याची शक्यता आहे. यामुळे सीबीआयने बंटी सजदेहची चौकशी केली आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह प्रकरणी वृत्तांकन करताना वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगावा - उच्च न्यायालय