मुंबई - सरकारी नोकरभरतीसाठी भाजप सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या सेवेत पारदर्शकता नसल्याची उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे ते बंद व्हावे यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
राज्यात सरकारी नोकरी भरतीसाठी भाजप सरकारने संकेतस्थळ सुरू केले होते. नोकरीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत, ते त्या संकेतस्थळावरून अर्ज करत. मात्र, या संकेतस्थळात पारदर्शकता नाही, अशी तक्रार वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत हे संकेतस्थळ बंद करावे आणि त्या जागी नवीन प्रणाली राबवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मागील पाच वर्षात सरकारी नोकर भरतीच्या ज्या जागा निघाल्या त्याची माहिती महापोर्टलवर देण्यात येत असे. मात्र, अर्ज करताना संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याच्या तक्रारी उमेदवारांनी वेळोवेळी प्रशासनाला केल्या. याची सरकार व प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे उमेदवारांनी आपल्या तक्रारी केल्या. याचे गांभीर्य लक्षात घेत आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापोर्टल बंद करण्याची मागणी केली.