मुंबई - घाटकोपर येथे नागरिकत्व सुधारणा विधेयकावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे अशिक्षित असून त्यांना सावरकर यांचे पुस्तक भेट देणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...
राहुल गांधी यांनी नुकतेच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजप सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया या योजनेला अपयशी व 'रेप इन इंडिया' असे विधान केले होते. यानंतर देशभर राहुल गांधी यांच्या विधानाचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज (शनिवारी) दिल्लीमध्ये काँग्रेसने 'भारत बचाव रॅली' आयोजित केली होती. यावेळी गांधी यांनी "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे." असे वक्तव्य केले होते. यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गांधींवर टीका करत "राहुल गांधी हे अशिक्षित आहेत त्यांना आम्ही सावरकरांचे एक पुस्तक पाठवणार आहोत. गांधी घराणं हे जास्त शिकलेले नाही. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेसोबत अन्याय केला आहे. काही दिवसानंतर सगळं काही सुरळीत होईल, अशी आशा स्वामी यांनी व्यक्त केली. आज घाटकोपर येथे नागरिकत्व सुधारणा कायदा यावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक कार्यक्रम घेतला होता, त्यासाठी स्वामी आले होते. भारतात अडीच कोटी घुसखोर आहेत, त्यासाठी ही सुधारणा होणे आवश्यक आहे. आता हा कायदा झाला याचा अपप्रचार केला जात आहे, असे स्वामी म्हणाले.
हेही वाचा - प्रियांका गांधी म्हणतात... होय, मोदी है तो मुमकीन है