मुंबई - लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचे 'वेगळे' आणि पहिला डोस घेणाऱ्यांचे 'वेगवान' नियोजन करणे हे आव्हानात्मक काम आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत झालेला अन्याय लसीकरणाच्या बाबतीत होऊ नये याची खबरदारी घ्या, असा सल्ला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयातील वकिलाच्या घरात घुसणाऱ्या चोरांना रंगेहाथ पकडले
राज्यसरकारची १८ ते ४४ वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरणाची घोषणा महत्वाकांक्षी तरीही स्वागतार्ह आहे. लस मिळवणे आणि सुरळीत लसीकरण करण्याचे मोठे आव्हान आहे. जनतेचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याच्या आव्हानांना पेलण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्या पाहिजेत. ज्यांचा दुसरा डोस आहे अशांना आधी लस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गर्दी होऊ नये यासाठी लसीकरणाचे सेंटर्स योग्य संख्येत असणे गरजेचे आहे. जेष्ठ नागरिक, रुग्ण यांना लसीकरणात आधी प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरुण वर्गाला लसीकरण देणे गरजेचे आहे. लसीकरण होताना विलंब अथवा दिरंगाई होता कामा नये. जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे कमीत कमी अवधी, हे सूत्र करावे लागेल. लसींचे उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे लागेल, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला.
येत्या १ मे रोजी दुसरा डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे, तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे, तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र शासनावर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे लसीकरण, रेमडेसिवीरचे ऑडिट आणि दररोज याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत आता मोटर बाईक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी