मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेता डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र एक करून कोरोनाच्या विरोधात लढा देताना पाहायला मिळत आहेत. मात्र, आता नामांकित खेळाडू असलेल्या डॉ. श्वेता शेरवेगार या कोरोनावर विजय मिळविण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. डॉ. शेरवेगार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यॉटिंग स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. येथील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्स व आरोग्य सेवकांची संख्या कमी पडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरुण डॉक्टरांना रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःहून पुढे येण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार डॉ. श्वेता शेरवेगार यांनी मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद पुढे आल्या आहेत. सध्या त्या दक्षिण मुंबईतल्या माझगाव, भायखळा, गिरगाव, कुलाबा परिसरात नागरिकांची तपासणी करून त्यांना कोविड-19 संदर्भात मार्गदर्शन करत आहेत.
डॉ. श्वेता यांनी 2018 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत यॉटिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले होते. त्यांना राज्य सरकारने यंदाचा राज्याचा सर्वोश्रेष्ठ पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले होते. आता राज्याला, मुंबईला खरी गरज वैद्यकीय सेवेची असल्याचे जाणून त्या आपले कर्तव्य बजाविण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.