मुंबई - डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप समोर असलेल्या रझाक चेंबर इमारतीचा भाग आज सकाळी कोसळला. एक महिला ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा जणांना सुखरूप बाहेर काढले, तर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप आणि एस टी इमारतीसमोर रझाक चेंबर इमारत आहे. ही इमारत म्हाडाची सेस इमारत असून ती चार मजली इमारत होती. डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप समोर सात मजली एसटी इमारत आहे. आज सकाळी 7.28 वाजण्याच्या सुमारास या इमारतीचा तिसऱ्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंतचा काही भाग कोसळला आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्याने जिन्याखाली एक महिला अडकली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबतची माहिती मुंबई पोलीस कंट्रोल रूमला मिळाल्यावर तशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला देण्यात आली आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले असल्याचा शोध घेतला असता सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यापैकी मुमताझ सुधानवाला वय 65 वर्षे या महिलेचा जेजे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचा - उद्या होणार अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय; राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती