मुंबई: राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने मुंबईत 'युवा संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना जे. पी. नड्डा म्हणाले की, मागणी आणि पुरवठा यानुसार तरुणाईने कौशल्य आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. तसेच कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. काळाप्रमाणे प्रत्येकाने स्वत:ला बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे गरजेप्रमाणे प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करा, असे आवाहनसुद्धा नड्डा यांनी केले.
तंत्रज्ञानाच्या जगात भारत प्रगत: जे. पी. नड्डा पुढे म्हणाले, सध्याचे जग हे दररोज बदलणारे आहे. आज देश जिथे उभा आहे, त्या देशाच्या भविष्याची चिंता करणे हे स्वाभाविक आपल्या सर्वांचे काम आहे. आतापर्यंत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे आम्ही १ कोटी १० लाख तरुणांना प्रशिक्षण दिले आहे. स्टार्टअपबद्दल सांगायचे झाले तर आधी देशात फक्त चार युनिकॉर्न होते. आज हा आकडा १०० वर गेला आहे. हा आपल्या देशाचा आणि युवा शक्तीचा महत्त्वाचा पुरावा आहे.
युवकांनो, मोठा विचार करा: तरुणांनो, कधीही लहान ध्येय ठेवू नका. मोठा विचार करा. तुमच्यासाठी अवकाश खुले आहे. त्याच्या पायाभरणीची सुरुवात आज करा. त्याकरिता सर्वांनी मोठा विचार करा, स्वतःचे मूल्यमापन स्वतः करा आणि कालपेक्षा आजचा दिवस कसा चांगला जाईल, याचा प्रयत्न करा असेही जे.पी. नड्डा म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, तांत्रिक शिक्षणासाठी कौशल्य विकास महत्वाचा ठरतो. यासाठी आपण सर्वांनी कल्पक असणे आवश्यक आहे. काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात आज भारत प्रगत बनला असून 'डिजिटलायझेशन' होत असताना युवक आघाडीवर असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर विशेष लक्ष वेधले आहे, असेही ते म्हणाले. आज युवकांच्या कौशल्य विकासाला बळ मिळाले आहे. खूप अडथळ्यांना तोंड देत हे मिशन पुढे जात आहे. कौशल्य शिकणे, त्यात प्राविण्य मिळवणे आणि अद्ययावत राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील नड्डा यांनी केले.
सिद्धिविनायकाचे दर्शन व आशीर्वाद: दोन दिवस महाराष्ट्राच्या दौर्यावर आलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज प्रभादेवी येथील मंदिरात सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर दादर येथील सावरकर सदनास नड्डा यांनी भेट दिली. या भेटीत सावरकरांशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती त्यांनी घेतली. सर्वप्रथम नड्डा यांनी सावरकर सदनातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन केले. त्यानंतर सावरकरांच्या सूनबाई सुंदर सावरकर यांची भेट घेऊन विचारपूस केली. सावरकरांशी संबंधित असलेला अनमोल ठेवा त्यांनी आस्थेने पाहिला व त्याबद्दल माहिती सुध्दा घेतली. नड्डा यांनी सावरकरांचे वास्तव्य असलेल्या खोलीची पाहणीसुध्दा केली.
हेही वाचा: