मुंबई : टीव्हीच्या जगातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन काल झाले. आज (3 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता सिद्धार्थचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहे. शवविच्छेदन काल (2 सप्टेंबर) दुपारी 3.30 वाजता सुरू झाले. तीन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. यावेळी दोन वॉर्डबॉय, व्हिडिओग्राफी टीम आणि दोन साक्षीदार उपस्थित होते.
आज सिद्धार्थवर अंत्यसंस्कार
काल दुपारच्या सुमारास सिद्धार्थचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले. यामुळे सिद्धार्थच्या चाहत्यांसह कलाविश्वावर शोककळा पसरली. दरम्यान, सिद्धार्थ शुक्लावर आज दुपारी 12 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत ब्रह्माकुमारी विधीनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुंबई पोलीस आज अधिकृत निवेदन जारी करणार आहेत आणि शवविच्छेदन अहवालही आज सिद्धार्थच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करणार आहेत. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह सर्वप्रथम जुहू येथील ब्रह्माकुमारी कार्यालयात नेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. येथे पूजा केल्यानंतर, मृतदेह त्याच्या घरी नेण्यात येईल.
सिद्धार्थच्या शरीरावर कुठेही जखमेच्या खुणा नाहीत - सूत्र
सूत्रांनुसार, सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाची कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये अनेक वेळा कसून तपासणी करण्यात आली. त्याच वेळी, डॉक्टरला अभिनेत्याच्या शरीरावर कुठेही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सध्या सिद्धार्थची आई, बहीण आणि मेहुणा यांचे जबाब नोंदवले आहेत.
सिद्धार्थच्या पीआर टीमचे निवेदन
तर, सिद्धार्थच्या पीआर टीमने कुटुंबाच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. 'आपण सर्वजण सिद्धार्थच्या मृत्यूने दु: खी आहोत. सिद्धार्थ एक मर्यादित व्यक्ती होता हे सर्वांना माहित आहे. म्हणून कृपया अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचे रक्षण करा. काळजी घ्या. बुधवारी रात्री सिद्धार्थ शुक्ला औषध घेऊन झोपला आणि गुरुवारी सकाळी उठला नाही. तर, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी झाली', असे सिद्धार्थच्या पीआर टीमने म्हटले आहे.