मुंबई - पीएमसी बँकेतील व्यवहारांवर आरबीआयने आणलेल्या निर्बंधांमुळे सुमारे 18 लाख खातेधारक चिंतीत आहेत. अशा परिस्थितीत पीएमसी बँकेचे विलीनीकरण दुसऱ्या बँकेत करून, खातेधारकांना दिलासा द्या, असा लेखी प्रस्ताव शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांना देण्यात आला.
केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी आरबीआय गव्हर्नरची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात, पीएमसी बँकेला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी आरबीआयच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली. तसेच 18 लाख खातेधारकांना दिलासा देण्यासाठी काही उपायही सुचविण्यात आले. पीएमसीचे विलीनीकरण, पंजाब नॅशनल बँक किंवा बँक ऑफ बडोदा किंवा आयसीआयसीआय बँक किंवा एचडीएफसी या बँकेत करावे, असे सुचविण्यात आले आहे. या भेटीदरम्यान झालेल्या बैठकीत, गव्हर्नर दास यांनी पीएमसी प्रकरणी ऑडिट सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : तणावात असलेल्या आणखी एका बँक खातेदाराचा मृत्यू
पीएमसी बँकेची सुरुवात माझ्या दक्षिण-मध्य मुंबई या मतदारसंघात झाली. त्यानंतर या बँकेच्या शाखा सर्वत्र पसरल्या. या बँकेत अनेक स्वतंत्र खातेधारक, सोसायट्या, गुरुद्वारा यांचे पैसे देखील अडकून आहेत. या पार्श्वभूमीवर, 18 लाख खातेधारकांना दिलासा मिळावा, म्हणून आरबीआय गव्हर्नर महोदयांची भेट घेतली. या प्रकरणी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन गव्हर्नर यांनी दिले आहे असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
हेही वाचा - पीएमसीच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल