मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लवकरच (Hearing on Disqualification of Maharashtra MLAs) होणार असल्याची महिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) पुढील आठवड्यात सुनावणी घेणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.
शिंदे- ठाकरे गटाला नोटीस : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारसंदर्भात महत्वाची बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला आहे. त्यानुसार आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार, आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दररोज एका आमदाराची सुनावणी घेणार आहेत.
सुनावणीला ठाकरे गटापासून सुरवात? : अपात्रतेसंदर्भात यापूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना दिले होते. परंतु, शिंदे गटाच्या आमदारांनी दोन आठवड्याचा वेळ मागितला होता. त्यामुळे लेखी उत्तर कळवलेल्या आमदारांची सुनावणी पुढील आठवड्यापासून होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती ठाकरे गटाने वारंवार केली आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांनी दिरंगाई केल्याचा आरोप सध्या विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर नार्वेकरांनी शिंदे गट, ठाकरे गटांना नोटीस बजावली होती.
हेही वाचा -
- Uddhav Thackeray PC : सर्वप्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे - उद्धव ठाकरे
- Mumbai HC Order: शासनाने राज्यपालांच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावे; उच्च न्यायालयाचे आदेश
- Maharashtra political Crisis: राज्यात कोणताही सत्तासंघर्ष राहिला नाही, सगळे व्यवस्थित सुरु - राहुल नार्वेकर