मुंबई: महाविकास आघाडीत फूट पडत असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. कधी मित्रपक्ष काँग्रेस नाराज असल्याची चर्चा असते. तर, कधी अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असतात. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही तीनही मित्रपक्ष आजही एकत्र आहोत. आमचा एकमेकांशी संवाद आहे. काँग्रेस सोबत आमचा संवाद सुरू आहे. मी स्वतः सोनिया गांधींशी चर्चा केली आहे. स्वतः के सी वेणुगोपाल हे महाराष्ट्रात येऊन प्रमुख नेत्यांशी चर्चा करत आहेत. हे अत्यंत चांगले आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेही मतभेद नाहीत. आमची वज्रमुठ दुसरी सभा नागपुरात होणार आहे. मी स्वतः सभेसाठी नागपुरात जाणार आहे. तीनही पक्षांचा बरोबरीचा सहभाग या सभेत असणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते हे स्वतःहून पुढाकार घेत आहेत.
पवार ठाकरे सकारात्मक चर्चा: महाराष्ट्रात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये रात्री 8 वाजता तब्बल दीड तास चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे सिल्व्हर ओकवर गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. या भेटीसंदर्भात माहिती देताना राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक पार पडली. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरविण्यावर चर्चा झाली. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे मी सांगू शकतो.
हा लाळघोटेपणा आणि फडतूसपणा: या मुख्य घडोमोडींसोबतच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीत दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेले भाष्य आणि त्यामुळे सुरू झालेला वाद हा अद्याप देखील थांबलेला नाही. या वादावर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या इतर 40 आमदारांवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, पलटी मारण्याला देखील मर्यादा असते. आमची अपेक्षा एवढीच होती की, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान तुमच्याच मंत्रिमंडळातील एका सहकार्याने केला. बाळासाहेब यांचा अपमान करणारे आजही तुमच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर तुम्ही मिंधे आहात. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये. या संदर्भात मुख्यमंत्री भूमिका घेणार आहेत का? हा लाळघोटेपणा आणि फडतूसपणा आहे. हिम्मत असेल तर राजीनामा मागा नाहीतर स्वतः राजीनामा द्या.