मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच मार्गदर्शन केले असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. काल (सोमवारी) देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
भेटीची चर्चा -
एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात असताना दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली होती. मात्र, अशी भेट होत असते. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात. आपल्याकडे तशी परंपरा आहे. शरद पवार यांची तब्येत सध्या थोडीशी खराब आहे. त्यामुळे फडणवीसांनी सदिच्छा भेट घेतली असेल, असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा - पदोन्नतीतील आरक्षण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरू
काय म्हणाले राऊत?
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, शरद पवार हेदेखील विरोधी पक्षनेते होते. त्याकाळात त्यांनी राज्याच्या विधिमंडळात चांगले काम केले आहे. ही भेट एक सदिच्छा भेट असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही. विरोधक सरकारच्या कामात अडथळे आणण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कान पवार यांनी टोचले असतील. पुढील 100 वर्षे विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही याबाबत शरद पवार यांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही -
ज्या पद्धतीने विरोधी पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण करतो आहे त्यामुळे पुढील शंभर वर्षे तरी महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही, याबाबत शरद पवार यांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल. प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही, असेही राऊत यांनी सांगितले.
पूर्वनियोजित बैठक -
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडत आहे. ही बैठक पूर्वनियोजित असली तरी पवार-फडणवीस भेटीमुळे या बैठकीला अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बैठक आहे. त्यामध्ये इतके विशेष असे काही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
तर शरद पवार यांच्यासोबत झालेली भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.