मुंबई - राज्यात आणि मुंबईत शिवसेना आणि भाजपा हे पक्ष कट्टर विरोधक असल्याचे चित्र आहे. मात्र, हेच दोन्ही एकेकाळचे मित्र असलेले व आता कट्टर विरोधक बनलेले पक्ष बोरीवली येथील एका भूखंडावरून एकत्र आल्याचे पालिका सभागृहात पाहायला मिळाले. यावरून भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी जुने मित्र एकत्र आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
काय होता प्रस्ताव? -
मुंबईतील बोरीवली एक्सर येथील ९० हजार ५०० चौरस मीटर इतक्या भूखंडावर उद्यानाचे आरक्षण आहे. त्यापैकी ३२ हजार १५५ चौरस मीटर इतका भूखंड पालिकेला मिळणार आहे. हा भूखंड एका विकासकाकडून ताब्यात घेताना पालिकेने ७० करोड रुपये अदा केले आहेत. संबंधित भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव २००९ मध्ये सुधार समितीत पास झाला होता. मधल्या काळात हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया न झाल्याने भूखंड मालकाला अतिरिक्त १०० कोटी रुपयांऐवजी तेवढा टीडीआर देण्यात यावा, असा प्रस्ताव आज पालिका सभागृहात मंजुरीसाठी आला होता.
सभात्याग आणि आरोप -
या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी विकासकाला आधीच ७० कोटी रुपये दिले असताना पुन्हा १०० कोटी रुपये किंवा तितकाच टीडीआर देण्यास विरोध केला. या प्रस्तावावर मतदान घेण्याचीही मागणी केली. मात्र, सत्ताधारी शिवसेना आणि त्यांचे सध्या कट्टर विरोधक असलेल्या भाजपाने एकत्र येत हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने सभात्याग केला असून भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी जुने मित्र एकत्र आल्याचा आरोप केला आहे. याबाबत महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.
भाजपाची भूमिका बदलली -
दहिसर येथील भूखंडाबाबत भाजपाची वेगळी भूमिका होती. किरीट सोमैया यांनी या भूखंडावरून शिवसेनेवर टीका केली होती. आता त्याच भाजपाने बोरीवली भूखंडाबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. यामुळे दहिसर आणि बोरीवली बाबत भाजपाची वेगळी भूमिका का? असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
हेही वाचा - टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांनी दाखल केले 1400 पानांचे आरोपपत्र; 140 साक्षीदारांचा समावेश