मुंबई: भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच विरोधकांवर मनी लॉन्ड्री सेल कंपन्यांचा आरोप केला जातो. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स आदी केंद्रीय तपास यंत्रणा लावल्या जातात. आताही एका उद्योजकाच्या सिंगापूर, मॉरिशस येते शेल कंपन्या असल्याचे समोर आले आहे. मनीलॉन्ड्रीगचा हा प्रकार आहे. भाजपचा एकही नेता यावर आवाज उठवायला तयार नाही. तपास यंत्रणा काही बोलत नाहीत. केवळ विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठीच त्या यंत्रणा काम करतात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
जाब सरकारला विचारणार : शेअर मार्केट वरून देशात विकास अधोरेखित करण्याचा कट रचला जात आहे. खरे तर शेअर मार्केट आणि सामान्यांचा काही यात संबंध नाही. सर्व सामान्यांनी मोठ्या विश्वासाने आपले पैसे एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवले आहेत. मात्र हे सरकार पैशांचा शेअर मार्केटमध्ये इतरांसाठी वापर करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे अदानीसारखे घोटाळे समोर आल्यानंतरही सामान्यांच्या पैशाचे काय होणार, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत.
घोटाळ्याशी थेट संबंध : मुळात भाजप देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त करण्याचे काम करत आहे. त्यामुळेच देशात गेल्या पन्नास वर्षात असा स्कॅम झाला नाही, असा घोटाळा झाला आहे. सत्ताधारी पक्षाचा या घोटाळ्याशी थेट संबंध आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जालनात आज विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत आदानी घोटाळ्यावरून सरकारला सभागृहात जाब विचारणार आहोत. तशी रणनीती आजच्या बैठकीत ठरवली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
अधोपतन करण्याचे कारस्थान सुरू : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही संजय राऊत यांनी शिवसेना स्टाईल टीका केली. या अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला नक्की काय मिळाले? मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आम्ही अनेक मागणी केल्या होत्या. मात्र अर्थ खात्याच्या साऊथ ब्लॉकला जो हलवा तयार करतात, तसा चमचाभर हलवा देखील वाट्याला आला नाही. हा अर्थसंकल्प पूर्णपणे भाजपच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून सादर केला आहे. मुंबईचे औद्योगिक अधोपतन करण्याचे कारस्थान यातून सुरु आहे. मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील : शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार होते, त्यापेक्षा अधिक शिक्षक पदवीवर आमदार आता असतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.