मुंबई - शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, असे समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिकच नव्हे, सर्वसामान्य मुंबईकर दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर जमत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. यंदा मात्र या मेळाव्यावर कोरोनाचे सावट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या फेसबुक लाइव्ह या ऑनलाइन व्यासपीठाचा वापर करत जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे दसरा मेळावाही ऑनलाइन घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान गर्दीने भरून जाते. सद्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना दसरा मेळावा होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विरोधी पक्ष असणारा भाजपा शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे गर्दी न करता हा मेळावा ऑनलाइन होण्याची शक्यता जास्त आहे. याआधी पावसामुळे 2006 साली मेळावा रद्द झाला होता.
ठाकरे कुटुंब आणि शिवाजी पार्क -
ठाकरे कुटुंब आणि शिवाजी पार्क याचे जुने नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा शिवाजी पार्क येथे घेतला होता. तेव्हापासून शिवसेनेसाठी या मैदानाचे विशेष महत्त्व आहे. याच मैदानातून जाहीरपणे बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचे नेतृत्व सोपवले.
शिवाय सन १९९५मध्ये जेव्हा मनोहर जोशी यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला. तेव्हा, जोशी यांचा शपथविधीही याच मैदानात झाला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा देखील त्यांनीही याच मैदानात शपथ घेतली. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे हे ही शिवाजी पार्क येथे राहतात. एकूणच ठाकरे कुटुंब आणि शिवाजी पार्कचे भावनिक नाते आहे.
आता छातीच्या 'एक्स-रे'वरूनही होणार कोरोनाचे निदान, मोबाईल व्हॅनद्वारे संशयितांचा घेणार शोध