मुंबई - कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीचा फटका देशासह राज्याच्याही तिजोरवर बसणार आहे. कारण, टाळेबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडले असून अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे राज्याच्या महसुलात मोठी घट होणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पवार जनतेशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, अनेकांचे रोजगार बुडाले, कारखाने-उद्योग बंद झालेत. महाराष्ट्र सरकारचा 2020-21चा अर्थसंकल्प पाहिल्यास त्यात राज्याचे महसूल उत्पन्न हे 3 लाख 47 हजार कोटींच्या आसपास होते. पण, आजची स्थिती पाहता या महसुलात तूट पडेल. ही महसुली तूट 1 लाख 40 हजार कोटी इतकी असेल. म्हणजे एकूण महसूलापैकी 40 टक्के उत्पन्न कमी होईल. याचा परिणाम राज्याच्या इतर विकास कामांवरदेखील होऊ शकतो. या सगळ्या प्रश्नांची देशाच्या प्रधानमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत भारत सरकारनेच राज्यांना सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षाही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.
कोरोना संकट संपल्यानंतर बेरोजगारीचे संकट येणार
कोरोनाचे हे संकट संपल्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण होणार आहे. हजारो लोक नोकरीपासून वंचित होतील, अशी आज स्थिती आहे. व्यापार, उद्योग व रोजगार हे सर्व काही सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचा विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.
रिझर्व्ह बँकेने फक्त मार्गदर्शन करु नये तर आदेश द्यावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचा परिणाम देशाच्या शेतीवर देखील झाला आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना सरकारने राबवायला हव्यात. व्याजदर शून्यावर आणण्याची गरज आहे, तसेच कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी वाढवण्याची गरज आहे. असेच काही निर्णय उद्योग व व्यापाराच्या संदर्भात घेण्याची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून जी पावले टाकली जात आहेत. त्यात आणखी वाढ केली पाहिजे. रिझर्व्ह बँकेने फक्त मार्गदर्शन करु नये तर आदेश द्यावा व आदेशाचे पालन सक्तीचे करायला हवे, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा - कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई पोलीस खात्यात विशेष बदल