मुंबई - लॉकडाऊनचा वृद्धाश्रमावर परिणाम होऊ नये म्हणून स्वतः हून काही जणांनी पुढाकार घेतला आहे. पालघर जिल्ह्यात असलेले शांतिनिवास सेवाग्राम वृद्धाश्रमाने लॉकडाऊनच्या काळात अडचणींवर मात करत आश्रमात असलेल्या नागरिकांसाठी सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे.
आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारा रोजचा दुधाचा पुरवठा इथल्याच गोशाळेतून होत आहे. साडे पाच एकरमध्ये असलेल्या या संस्थेच्या आवारातच रोजचा भाजीपाला व कडधान्याचे उत्पादन घेतले जात असल्याने लॉकडाऊनचा कुठलाही त्रास या वृद्धाश्रमाला नाही. लॉकडाऊन असल्याने परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेता सध्या बाहेरून हे वृद्धाश्रम बंद करण्यात आले असले, तरी आतमध्ये असलेल्या जेष्ठ महिला व पुरुष नागरिकांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी येथील साई मंदिरात प्रवचन सुरू करण्यात आले आहे.
त्याचबरोबर, आश्रमात वाचनालय, कॅरम व इतर बैठे खेळ खेळले जात आहे. संस्थेच्या आवारातच जिवनावश्यक वस्तूंचे उत्पादन घेतले जात आहे. आश्रमात बाहेरून खूपच कमी गोष्टी आणल्या जातात. लॉकडाऊनचा कार्यकाळ हा ३ मे पर्यंत जरी वाढवण्यात आला असला, तरी कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सरकार व प्रशासनाला हवी ती साथ देऊ, असे वृद्धाश्रमाच्या विश्वस्तांनी म्हटले आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई