मुंबई : गुजरात मधील वडोदरा येथे गोध्रा हत्याकांडानंतर 2002 मध्ये घडलेल्या बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांना कोर्टामध्ये साक्ष देण्याकरिता हजर न करता आलेल्या गुजरात पोलिसांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने फटकारले ( Sessions Court reprimanded the Gujarat Police ) आहे. पोलिसांना साक्षीदारांना हजर करण्याची साधी गोष्ट जमत का नाही? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणी दरम्यान साक्षीदारांना हजर करण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिली आहे.
बेस्ट बेकरी हल्ला प्रकरण - गुजरात मधील वडोदरा येथील हनुमान टेकरी येथील 1 मार्च 2002 रोजी बेस्ट बेकरी वरील हल्ल्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 14 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात साक्षीदारांना हजर न करणाऱ्या गुजरात पोलिसांना चांगले धारेवर धरले होते. गुजरात पोलिसांना साक्षीदारांना हजर करण्याची साधी गोष्ट जमत का नाही? आता याबाबत आम्हाला विचार करावा लागेल. आणखी चालढकल चालणार नाही अशी कठोर भूमिका न्यायालयाने घेतली.
पुढील सुनावणी 20 ऑक्टोबर रोजी - मुंबई सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणीवेळी सरकारी पक्षाने दोन साक्षीदार हजर करण्यात गुजरात पोलिसांनी यश आले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही साक्षीदारांविरुद्ध समन्स जारी केले असून त्यांना मुंबईत आणण्याच्या प्रवास खर्चासाठी पैसेही दिले आहेत. मात्र साक्षीदार हजर राहू शकले नाहीत, असे सरकारी वकिलांनी सांगितले.याप्रकरणी 20 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.
न्यायलयाची नाराजी - यावेळी त्यांनी साक्षीदारांना हजर करण्यासाठी आणखी वेळ मागून घेतला. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांच्या अपयशावर नाराजी व्यक्त करीत, आम्हीच आता तिथल्या स्थानिक न्यायालयाशी पत्रव्यवहार करून साक्षीदारांना हजर राहायला लावतो, असे न्यायाधीश देशपांडे यांनी नमूद केले. मफत गोहील आणि हर्षद सोळंकी या आरोपींनी ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. बेस्ट बेकरी हिंसाचार प्रकरणात 2010 मध्ये राजस्थान पोलिसांनी सोळंकीला अटक केली होती.