मुंबई : दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वकिल सीमा समृद्धी कुशवाह ( Seema Samridhi Kushwaha ) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. निर्भया, हाथरस सामूहिक बलात्कार, ( Hathras gang rape ) हत्या प्रकरणात आरोपींनी कठोर शिक्षा मिळवण्यासाठी कुशावाह यांनी न्यायालयात लढाई लढली आहे. आता वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची ( Shraddha Walker murder case ) न्यायालयीन लढाई कोर्टात कुशावाह लढणार आहेत. सीमा कुशवाह यांनी श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करून हत्या करणाऱ्या आफताब पुनावालाला फाशी शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी ईटीव्ही भारतशी बोलताना केली आहे.
कोण आहेत सीमा कुशवाह? : सीमा समृद्धी कुशवाह यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी उत्तर प्रदेशातील इटावा येथील बिधीपूर ग्रामपंचायत उग्रापूर येथे झाला. त्यांचे वडील बलादिन कुशवाह हे देखील गावप्रमुख राहिले आहेत. 12 वीनंतर सीमा पदवीसाठी औरैया या ठिकाणी आल्या. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. आता अभ्यासासाठी पैशाची व्यवस्था स्वतः करावी लागेल, असेही कुटुंबीयांनी सीमाला सांगितले.
कॉलेजच्या फीसाठी विकावे लागले पैंजण : सीमा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्याकडे कॉलेजच्या फीसाठी पैसे नाहीत, म्हणून तिने मावशीने दिलेले सोन्याचे दागीने विकले होते. कुशावाह यांनी मुलांना ट्युशन शिकवून कशीतरी पदवी मिळवली. कुशावाह यांनी कानपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. एलएलबीच्या पहिल्या वर्षाला असताना सीमाला इटावाहून कानपूरपर्यंत रोज अप-डाऊन करावे लागत होते. दुसऱ्या वर्षी कानपूरला शिफ्ट झाले. तिथे एका स्थानिक मासिकात अर्धवेळ नोकरी करून काही पैशांची व्यवस्था केली असे सीमा यांनी सांगितले.
सीमा यांना व्हायचे होते IAS : सीमा यांनी 2006 मध्ये उत्तर प्रदेश राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी राज्यशास्त्रात एमएही केले. कानपूरमधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर सीमा कुशवाहा दिल्लीला गेल्या. दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर सीमाने २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. सीमाचे पती राकेश, मुंगेरच्या संग्रामपूर ब्लॉकमधील पौरिया गावात राहणारे, गणिताचे शिक्षक आहेत. दिल्लीतील एका IIT तयारीच्या ते संस्थेशी संबंधित आहेत. सीमा यांना आयएएस अधिकारी बनायचे होते, त्यासाठी तयारीही केली होती, मात्र त्यांचे स्वप्न पुर्ण होवू शकले नाही.
निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी : डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या निर्भया प्रकरणात त्यांनी IAS निर्णय बदलला. जानेवारी २०१३ मध्ये जेव्हा साकेत कोर्टात पहिल्यांदा आरोपपत्र दाखल करण्यात आले तेव्हा सीमा कुशवाह निर्भयाच्या कुटुंबाच्या संपर्कात आल्या. त्यानंतरच्या वर्षी २०१४ मध्ये कायदेशीररित्या या प्रकरणात सामील झाल्या. निर्भयाच्या न्यायाच्या आंदोलनात सीमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होती. निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतरच सीमा या प्रकरणातून बाहेर पडल्या. यादरम्यान सीमा निर्भयाच्या आई-वडिलांसोबत मुलीप्रमाणे राहिल्या. निर्भयाला न्याय मिळाल्याबद्दल संपूर्ण देशाने सीमा कुशावाह यांना सलाम केला आहे. सोशल मीडियावर लोक कुशावाह यांचे अनेक चाहते आहेत.
हाथरस प्रकरणाची लढाई न्यायालयात सुरु - हाथरस प्रकरणात सीबीआयने अलीकडेच चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर काही संस्था या चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले होते. हाथरस या २०२० साली झालेल्या सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणाची न्यायालयीन लढाई सीमा कुशवाह लढत आहेत. सीमा यांनी उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मायावतींची विचारसरणी निवडली असून त्यांनी बहुजन समाज पक्षात (बसप) प्रवेश केला आहे.
हाथरस गंभीर प्रकरण : १६ सप्टेंबर २०२० ला हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. अत्याचार करणाऱ्या नराधमांनी तिची जीभ देखील कापली. पीडित तरुणी अनेक दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. २९ सप्टेंबरला २०२० तिचा मृत्यू झाला. या तरुणीच्या मृतदेहावर मध्यरात्री पोलिसांनी तिच्या कुटुंबियांची संमती न घेताच अंत्यसंस्कार केले. यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. याप्रकरणी वकील सीमा कुशवाह न्यायालयात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत.