मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात अभिनेत्री कंगना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र आपल्या भावाचे लग्न असल्यामुळे 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणे शक्य नसल्याचे कंगनाने वकिलामार्फत वांद्रे पोलिसांना कळवले आहे. याआधीदेखील तिला चौकशीला बोलवण्यात आले होते, मात्र ती हजर झाली नव्हती. तर आता 15 नोव्हेंबरनंतर आपण चौकशीसाठी पोलीस ठाण्यात येऊ, असेही कंगनाकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडमध्ये मुस्लीम व हिंदू कलाकारांमध्ये मतभेद असल्याचा दावा केला होता. त्यामुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत याचिकाकर्ते मुनावर अली साहिल अश्रफ यांनी वांद्रे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीच्या वेळेस याचिकाकर्त्यांनी कंगनाच्या सोशल माध्यमांवर वादग्रस्त पोस्टसंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.