मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाला सोमवारपासून सुरूवात झाली. पहिला दिवस वैज्ञानिक विकास महामंडळ, पेट्रोल-डिझेलचा निषेधार्थ काँग्रेसने काढलेली सायकल रॅली आणि आदी प्रकरणामुळे गाजला. आजही विरोधकांकडून प्रश्नोत्तरे, स्थगन प्रस्तावांसह अन्य मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला घेरण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून कामकाज बंद पाडण्याचे, तर सत्ताधाऱ्यांकडून ते रेटण्याचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजणार आहे.
विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार -
काल वैधानिक महामंडळांना दिली जाणारी मुदतवाढ, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती, पेट्रोल-डिझेल वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने काढलेली सायकल रॅली आणि भाजपने त्याला घोषणाबाजी करून प्रतिउत्तर दिल्याने सकाळपासून गोंधळाची स्थिती होती. आज ११ वाजता विधानसभा, तर १२ वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. प्रश्नोत्तरे, स्थगन प्रस्ताव मांडण्याची विरोधकांना संधी आहे. वीज बील, मराठा आरक्षण, कोविडमधील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात पूर्णतः सवलत, धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांना कामात अडथळा आणला जाण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांकडून दैनंदिन कामकाज पूर्ण करण्याचे उद्दिष्टे असेल. त्यामुळे दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळतील.
राठोड अधिवेशनाला हजर राहणार का?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. चव्हाण मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे, परंतु विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरून पायउतार होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. तसेच दोन दिवसानंतर मुंबईत येणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राठोड गैरहजर राहिले. मात्र, आज दुसरा दिवशी असल्याने ते हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - वैधानिक विकास महामंडळांच्या मुदतवाढीवरून गाजला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस