मुंबई - विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यातील उमेदवार महाविकास आघाडीने आज जाहीर केले. नाशिकमध्ये सत्यजीत तांबेंना धक्का देत, शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. तसेच नागपूरमध्ये सुधाकर आडबाले, अमरावतीत धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये विक्रम काळे, कोकण मतदारसंघात बाळाराम पाटील हे उमेदवार असून या पाचही जागा निवडून येतील, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्यावतीने पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार तसेच विधान परिषदेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत, आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.
शुभांगी पाटील यांना पाठींबा - काँग्रेसकडून उमेदवारी मिळूनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. भाजपनेही महाविकास आघाडीवर टीका केली होती. दुसरीकडे शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे नाशिक, नागपूरच्या जागेंवर महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
भाजपच्या काळता बेरोजगारीत वाढ - पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये सुधारक अडबाळे, अमरावती धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील, कोकण मध्ये बाळाराम पाटील असे पाच महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत. पाचही जागांच्या निवडणुका जिंकू, असे वातावरण आहे, असे पटोले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर पटोले यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या काळात शेतकऱ्यांची गळचेपी झाली. तरुणांचे भ्रम निराशा झाली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुनी पेन्शन कुठेही चालू केलेली नाही. तरुणांमध्ये भाजपचा राग असल्याचे स्पष्ट होते, असे पटोले म्हणाले.
भाजपला जनताच धडा शिकवेल - भाजप हा देशातील नव्हे तर जगातील मोठा पक्ष आहे. परंतु, त्यांना नाशिकमध्ये उमेदवार मिळालेला नाही. आता नाशिकमध्ये भाजपचा गोंधळ समोर येणार आहे. त्यामुळे पाचही जागा जिंकतील, असे वातावरण निर्माण आहे. मागून वार करायची पध्दत समोर आली आहे. कोणत्या आधारावर घरे फोडत आहेत. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला भाजपने कुठे लपवले आहे. त्याच्यावर काय कारवाई केली. कोणीही सरसकट आरोप करायचे. खोट्या आरोपावरून न्यायालयाने फटकारले. भाजपला तेवढे तरी कळायला हवे. अशा पद्धतीने धाक दाखवून, भीती दाखवून दुसऱ्याची घरे फोडायची, आपली घरे सजवायची, असे चालणार नाही. हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. कोणाच्या प्रलोभनाला झुकणारा नाही. भाजपला आता जनताच धडा शिकवेल, असे पटोले यांनी सांगितले.
सत्यजीत तांबेंचे निलंबन - अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेंवर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारण्यात आला असता, पटोले म्हणाले की, तांबेंचे निलंबन केले आहे. वरिष्ठांनी या संदर्भातील आजच पत्र काढले आहे. तर डॉ. सुधीर तांबेंना यापूर्वी निलंबित केले आहे. आता तांबे परिवाराचा विषय आमच्यासाठी संपला आहे. तसेच, बाळासाहेब थोरात आमचे नेते असून ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यांच्याशी आम्ही नंतर चर्चा करु, त्यांचे म्हणणे जाणून घेऊ, असे पटोले यांनी सांगितले. तसेच शिक्षक भारतीचे नेते कपील पाटील यांनी तांबेंना पाठिंबा असला तरी फरक पडणार नाही, असे स्पष्ट केले. तर, महाविकास आघाडीची भूमिका जी राष्ट्रवादी, शिवसेनेची असून आमच्या उमेदवारांचा एकत्रितरित्या प्रचार करत आहोत, असे दानवे आणि आव्हाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - PM Modi Mumbai Visit : विकासाचे स्वप्न दाखवत पंतप्रधानांनी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले