मुंबई - पूर्व उपनगरात विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गजाजन महाराज (शेगाव) सेवा मंडळातर्फे १९८३ पासून हा प्रकट सोहळा येथे साजरा करण्यात येतो.
श्रींच्या पालखी दर्शनासाठी आज भाविकांसह नागरिकांनी शोभायात्रा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हा सोहळा पार पाडण्यासाठी पुढाकार घेतात. पूर्वी या सोहळ्यासाठी हत्ती, घोडे तसेच पालखी आणली जायची. मात्र, आता हे प्राणी आणणे बंद झाले आहे. या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तळागाळातील विविध मंडळींना भजन सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.
अध्यात्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेतल्याने चांगली पिढी घडायला मदत होते, असे औदुंबर सराफ यांनी सांगितले. पूर्व उपनगरात या प्रकटदिनाला महत्व आहे. या सोहळ्यावेळी विविध समाजघटकांतील नागरिक एकत्र येतात, यामुळे सामाजिक एकोपा निर्माण होतो, असे मंडळाचे उपाध्यक्ष गिरीश मळगावकर यांनी सांगितले.