मुंबई : खासदार संजय राऊत म्हणाले की, वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत आदित्य ठाकरे नावाच्या 32 वर्षाच्या तरुणाने मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. या आव्हानानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडायला सुरुवात झाली. आज वरळीत एकटे मुख्यमंत्री येत नाही तर त्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री देखील आहेत. म्हणजे त्यांनी किती गांभीर्याने घेतले आहे वरळीला. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला गांभीर्याने घेतले याचा आनंद आहे.
आम्ही आव्हानावर ठाम आहोत : खासदार राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी जे काही आव्हान दिले त्यावर आम्ही आजही आणि आताही ठाम आहोत. आदित्य ठाकरे असेही म्हणाले होते की, तुम्ही राजीनामा द्या आणि वरळीत या. त्यांनी खरेतर राजीनामा देऊन वरळीत यायला हवे होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून वरळीत जात आहेत. तुम्ही वरळीत येणार म्हटल्यावर हजार बाराशे पोलीस तिथे आले आणि पोलीस म्हटले की वर्ध्यात काय झाले हे सर्वांना माहितीच आहे. वर्धाच्या साहित्य संमेलनामध्ये बुजुर्ग न्यायाधीश चपळगावकर यांनाच पोलिसांनी अडवले.
लोक कोळ्यांच्या वेशात बसतील : वर्ध्यात घडलेला सर्व घटनाक्रम पाहता बहुदा यांचेच लोक वरळीतल्या सभेत कोळ्यांच्या वेशात बसतील असे दिसते. आम्हाला आनंद आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पाय वरळीला लागत आहेत. पण आदित्य ठाकरे यांचे आव्हान आहे की, त्यांनी राजीनामा देऊन वरळीत यावे. आम्ही संध्याकाळपर्यंत वाट बघू ते मुख्यमंत्री म्हणून वरळीत येतात की राजीनामा देऊन वरळीत येतात? एका 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसे घाबरते हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिल. अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली आहे.
वरळीतून लढण्याचे आव्हान दिले होते : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जोरदार जुंपली होती. वरळीची जागा आम्ही जिंकणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता तर मुख्यमंत्र्यांनी ३२ वर्षांच्या तरुणाचे आव्हान स्वीकारावे, अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी याआधीही केले होते. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या विश्वासातील माजी नगरसेवकही शिंदे गटाकडून गळाला लावण्यात आले होते. यामुळे अस्वस्थ असलेल्या आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच वरळीतून लढण्याचे आव्हान दिले होते.