Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल - राहुल नार्वेकर
Sanjay Raut on Dasara Melava : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन पुन्हा एकदा शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. त्यामुळं यावर्षीही शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार अशा चर्चा सुरु आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर टिका केलीय.


Published : Sep 30, 2023, 2:36 PM IST
मुंबई Sanjay Raut on Dasara Melava : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन मागील वर्षी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात मोठा संघर्ष पेटला होता. याही वर्षी देखील असंच काहीसं होण्याची शक्यता आहे. यंदा शिवाजी पार्कसाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांनी पालिकेकडं अर्ज केले असून, यामुळं पुन्हा एकदा दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. त्यामुळं यावर्षीही शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार अशा चर्चा सुरु आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर टीका केलीय.
आमची खरी शिवसेना : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? सर्वांनी एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली आणि बाळासाहेब हयात असतानाच त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारिणीनं उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. आम्ही फुटलेलो नाही तर ते फुटले आहेत. दिल्लीत त्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रातही त्यांची सत्ता आहे, म्हणून तुम्ही काहीही कराल तर ते इथं चालणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी शिंदे गटावर टीका केलीय. तसंच गेल्या वर्षीचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथ झाला होता. या वर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्क इथंच होईल, असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
महाराष्ट्रात लोकशाही मरतेय : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा प्रस्तावित परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर घाना इथं होणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत सहभागी होणार होते. मात्र, आता अचानक हा दौरा रद्द करण्यात आलाय. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "राहुल नार्वेकर लोकशाहीवर प्रवचन द्यायला घानाला जाणार होते आणि महाराष्ट्रात मात्र लोकशाही मरत आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली जबाबदारी ते पाळत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचं नसल्याचं ते वारंवार दाखवत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी राहूल नार्वेकरांवर टीका केलीय. तसंच नार्वेकरांचा दौरा रद्द झाला हे मला आता कळल्याचं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
- Sanjay Raut On Rahul Narvekar : राज्यात लोकशाहीचा खून, 'ते' मात्र लोकशाही मजबुतीसाठी विदेशात; संजय राऊतांचा हल्लाबोल
- Sanjay Raut On Pm Modi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
- Nitesh Rane : संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घाला; आमदार नितेश राणेंची मागणी