मुंबई : सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. या दौऱ्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबरी मशीदबद्दल गंभीर वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर 40 आमदारांनी राजीनामा द्यावा अशी, मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
ठाकरेंचा अपमान करण्याची हिंमत नव्हती : यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, लक्षात घ्या हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. या मिंधे सरकारकडून आता आम्हाला प्रतिक्रीयाची अपेक्षा असल्याचे संजय राऊत म्हणाले. याआधी बाळासाहेब ठाकरे यांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कोणी दाखवली नव्हती. ही हिंमत तुम्ही गुलाम झाल्यामुळे भाजप करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील किंवा भाजपचे लोक सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.
मिंधे सत्तेतले गुलाम : शिवसैनिकांनी बाबरी तोडल्यानंत भारतीय जनता पक्षाने पलायन केले. हा खरा इतिहास आहे. बाबरी तोडणारे RSS, भाजपचे किंवा अन्य कोणी नव्हते, ते शिवसैनिक होते. हे भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर लगेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व असल्याचे बाळासाहेब म्हणाले होते. पळपुट्यांना घेऊन हे सरकार बनले आहे. या पळपुट्यामुळेच भारतीय जनता पक्षाची हिंमत एवढी वाढलेली आहे. आता बाळासाहेब ठाकरेंवर भाजप चिखलफेक करत आहेत. त्या चिखलात बसून मिंधेसह त्यांचे चाळीस आमदार सत्ता भोगत आहेत. भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून बोलतोय, हे त्यांना माहीत आहे. शिवसेना आणि हिंदुत्वाचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. भाजपच्या सत्तेत सहभागी झालेले आम्ही गुलाम आहात अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे सरकारवर केली आहे.
बाळासाहेब CBI समोर हजर झाले होते : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, भाजपच्या चड्डीचा नाडा पकडलेले मिंधे सरकार हातात नकली धनुष्यबाण घेऊन अयोध्येत गेले होते. त्यानंतर महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा हात नसल्याचे आरोप केले. अयोध्याच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या प्रत्येक घडामोडीमध्ये हिंदुत्वाची मशाल पेटती राहावी यासाठी बाळासाहेबांनी केलेला संघर्ष या देशाला माहिती आहे. त्याच जाणिवेतून आजचा भारतीय जनता पक्ष निर्माण झाला. त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांच्या तेव्हाच्या प्रखर भूमिका होत्या. बाळासाहेब ठाकरे बाबरी कांडानंतर लखनऊला जाऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले होते. हे भाजपला माहित नाही का? तुम्ही शिवसेनेचे अस्तित्व, बाळासाहेब ठाकरेंचे नाव मिटवण्याचा प्रयत्न करत आहात अशा टीका त्यांनी भाजप-शिंदे सरकारवर केली आहे.