मुंबई - दोन महिन्यानंतर धारावीतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असून देशभरात धारावी पॅटर्नचे कौतुक होत आहे. या धारावी पॅटर्नमध्ये साई हॉस्पिटल आणि त्यातील डॉ. खालीद शेख, डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. हे रुग्णालय धारावीकरांसाठी संजीवनी, तर डॉक्टर देवदूत ठरले. मुंबईतीलच नव्हे तर देशातील हे पहिले खासगी रुग्णालय होते, जे कोव्हीड रुग्णालयामध्ये रूपांतरीत झाले. या खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या बरोबरीने रुग्णसेवा करत धारावीतील कोरोनाचा विळखा सैल केला.
धारावीतील 90 फूट रोड येथे 2009 पासून 51 खाटांचे साई रुग्णालय आहे. कोरोनाचा कहर वाढल्यानंतर अनेक खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांनी शटर डाऊन केले. पण, धारावीसारख्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये फक्त हे एकच रुग्णालय सुरू होते. यामध्ये कोरोना रुग्णांचीही तपासणी केली जात होती. या रुग्णालयाचे मालक आणि डॉ. शेख यांनी न घाबरता कोरोना रुग्णांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेला मदत करण्याची तयारी दाखवत हे रुग्णालय कोव्हीड रुग्णालय म्हणून रूपांतरित करून घेतले.
मुंबईतीलच नव्हे तर देशातील हे पहिले खासगी कोव्हीड रुग्णालय म्हणून जाहीर झाले. 5 एप्रिलपासून रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली. यापूर्वी डॉ. शेख आणि त्यांचे सहकारी डॉ. वाघमारे यांनी पुढाकार घेत काम सुरू केले. त्यांच्याबरोबर हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच कर्मचारी होते. पण नंतर या कामाचे महत्व लक्षात आल्याने कर्मचारी वाढत गेले. दुसरीकडे रुग्णही वाढले. मग कोरोना रुग्णांना चांगले उपचार देत कोरोनाला हरवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय झाले. आज त्यांचे हे ध्येय अंतिम टप्प्यात आहे. कारण आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. या दोन महिन्यात साई रुग्णालयामध्ये 300 रुग्ण दाखल झाले, तर त्यातील 280 रुग्ण बरे हाऊन घरी गेले. एकही मृत्यू येथे झाला नाही. त्यामुळे हे रुग्णालय आणि हे डॉक्टर धारावीकरांसाठी देवदूत ठरले, असेच म्हटले जात आहे.