मुंबई - देशभरात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आली असल्याचे हळूहळू उघड होणाऱ्या निवडणूक निकालांच्या कलावरून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाकी सर्व आघाड्यांना पुरते झोपवले आहे, असे हाती आलेले कल सांगतात. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकाही जागेवर सध्या काँग्रेस आघाडीवर नाही.
राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे आणि एका जागावर आघाडी आहे. तर युती ५ जागांवर विजयी आणि ३८ जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यावर सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कौल मान्य केला. जनतेने जे निकाल दिले आहेत त्याचा ही स्वीकार करतो, अशी प्रतिक्रिया देत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे अभिनंदन केले आहे. निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या या विजयाबद्दल शुभेच्छा देत असतानाच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या सरकारच्या पुढील कार्यकाळासाठी असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या.
गेल्या ५ वर्षात भाजप सरकारने जीएसटी आणि नोटबंदीसारख्या ज्या ज्या चुका केल्या आहेत, त्या पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यावी, असा सल्लादेखील यावेळी सचिन सावंत यांनी दिला. तसेच भाजप सरकार येत्या काळात संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करेल, माध्यमांना पुर्णपणे स्वातंत्र्य देतील, विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही, अशा अनेक अपेक्षा ठेवून सचिन सावंत यांनी खोचक शब्दात भाजपचे अभिनंदन केले.