मुंबई - मोदी शाह जोडगोळीला देशातील लोकशाही संपुष्टात आणायची असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी केले आहे. कर्नाटक सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन कमळमध्ये फडणवीस सरकारही सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक महिन्यात राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याच्या बंगल्यावर यासंदर्भात बैठका झाल्या असल्याचेही सावंत म्हणाले.
आमदार खरेदीसाठी राज्यातील भाजपा नेते पैसा लावत आहेत. अशा सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे म्हणत सचिन सांवत यांनी सरकारवर निशाणा साधला. कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या प्रयत्नांतून त्यांचा लोकशाही विरोधी अनैतिक व हिडीस चेहरा पुन्हा दिसून येत आहे. येडियुरप्पा खुलेआम आमदारांची बोली लावत आहेत. यंत्रणांचा वापर करुन भाजपला गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, बिहार, तमिळनाडू, बंगालमधील सर्व विरोधी पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे लोकशाही संकटात असल्याचे सचिन सावंत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस आणि जेडीएसला पुन्हा एकदा दोरदार धक्का बसला आहे. आत्तापर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात आले आहे.